पुणे दि.२२-कसबा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या सदैव कार्यमग्न राहिल्या. उत्तम संघटन कौशल्य आणि व्यापक जनसंपर्क हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वाखाणण्याजोगे गुण होते. महापालिकेच्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या, विरोधीपक्षनेते पद आदी जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या.
सन २०१७ साली पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश मिळाल्यानंतर पक्षाने मुक्ताताईंकडे महापौरपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्याच्या विकासात भरीव योगदान दिलं. मुक्ताताईंच्या जाण्याने एका प्रामाणिक कार्यकर्तीला आणि कर्तव्यनिष्ठ लोकप्रतिनिधीला मुकलो असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.