भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू असून भारतीय राज्यघटना संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कायदे तयार केले, अर्थव्यवस्था, ऊर्जा, सिंचन, महिला धोरण, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी केली आणि या धोरणाला मानवतेच्या विचारांची जोड दिली. त्यामुळेच देशाची एकता, बंधुता, एकात्मता या तत्त्वांना बळ मिळाले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आजच्या पिढीला लक्षात येण्यासाठी शासनाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. मा. सर्वोच्च न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. जगाला हेवा वाटेल असे इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामालाही वेग दिला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.