*‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ*
सांगली दि. ८ – ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले. म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्ह्णाले.
राज्य सरकारला केंद्र शासनाचे सहकार्य मिळत असल्याने राज्याचा विकास चौफेर होतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 500 निर्णय घेतले. आत्तापर्यंत 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम आपल्या सरकारने केले. सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. तसेच 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारने पाच लाख कोटीचे करार केल्याचे सांगून त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल. सांगली जिल्ह्यातील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे नाव काढलं डोळ्यासमोर येतो तर या जिल्ह्याने लढलेला स्वातंत्र्यसंग्राम आणि मोठमोठे उद्योजकही या मातीत घडले अनेक नामवंत व्यक्तिमत्व या मातीमध्ये आणि म्हणून अनेक उत्तम प्रशासक अधिकारी दूरदृष्टी असलेले नेते सामाजिक नेते राजकीय नेते या मातीने घडवले. राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे सांगलीची विकासाकडे जोमाने वाटचाल सुरू आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली तसेच सभामंडपात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोबाईल टॉर्च दाखवून आणि त्याला उपस्थित नागरिकांनीही आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.