अंबरनाथ येथे श्री मलंगगडाच्या पायथ्याशी उसाटने – नार्हेण फाटा येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांशी संवाद साधला.
संत-महात्म्यांच्या समाजप्रबोधनाचा मोठा वारसा महाराष्ट्राला असून शेतकरी आत्महत्या असलेल्या भागात कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाचे काम वारकऱ्यांनी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांसाठी गठीत केलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत असून तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास 138 कोटी रुपयांचा निधी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत, यापुढे अधिकाधिक सोयी-सुविधा दिल्या जातील. शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही असे अनेक उपक्रम या शासनाकडून राबविण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ महाराज म्हाळूंगे, चेतन महाराज म्हात्रे, दिगंबर शिवनारायणजी, विष्णूदादा मंगरुरकर, गणपत सांगू देशेकर, गोपाल चेतनजी , शंकरजी गायकर, दिनेश देशमुख, गणेश पीर, आणि माजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तसेच अनेक साधू संत, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.